Pune News : महिलेकडून प्रधानमंत्री कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत ५० लाखांचा गंडा

पुणे : दिल्लीतील प्रधानमंत्री कार्यालयात (पीएमओ) राष्ट्रीय सल्लागार पदावर काम करत असल्याचे भासवून शासकीय टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका महिलेने ठेकेदाराला तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातला.
याप्रकरणी काश्मीरा संदीप पवार (२९,रा.काेयना साेसायटी,सदर बाजार सातारा) व गणेश गायकवाड (रा.सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गाेरख जगन्नाथ मरळ (४९,रा.सहकारनगर,पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पाेलीस ठाण्यात दोघांवर भादंवि कलम ४१९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाेरख मरळ हे ठेकेदार आहेत. ते विविध शासकीय कार्यालयातील कामे टेंडर भरुन घेतात. तर आराेपी काश्मिरा पवार ही स्वत:ला राष्ट्रीय सल्लागार म्हणून भासवत होती.
या दोघांची एका मध्यस्था मार्फेत ओळख झाली हाेती तीचे बोलणे आणि राहणीमान बघुन गोरख यांचा तीच्यावर विश्वास बसला होता. यानंतर तीने गोरख यांना शासकीय टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवत विश्वास संपादन केला.
त्यांना पुण्यातील विधानभवन परिसरात भेटण्यासाठी बाेलवले. तेथेही ती स्वत:ला राष्ट्रीय सल्लागार असल्याचे भासवत होती. तीथे तीने गोरख यांना लवकरच शासकीय टेंडर मिळवून देणार आश्वासन दिले.
त्यांच्या व्हाॅटसअपवर शासकीय टेंडरची बनावट कागदपत्रे देखील पाठवून दिली. टेंडर मिळाल्यावर त्यातून कमी काळात चांगल्याप्रकारे पैसे मिळतील असे आमिष दाखवले.
गोरख यांचा विश्वास संपादन केल्यावर काश्मीरा हिने त्यांना टेंडर मिळण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार काश्मीरा हिने तिचा साथीदार गणेश गायकवाड याच्या मदतीने गोरख यांच्याकडून वेळाेवेळी राेख व आरटीजीएसद्वारे ५० लाख रुपये घेतले.
परंतु पैसे मिळाल्यानंतर त्यांना काेणत्याही प्रकारचे टेंडर न देता तसेच पैसे परत न करता फसवणुक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गोरख यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर प्राथमिक तपासात काश्मीरा आणि गणेश हे पती-पत्नी असल्याचे लक्षात आले. तसेच काश्मीरा हिच्यावर सातारा येथेही एक बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवी गायकवाड करत आहेत.




