Pune News | पुणे जिल्ह्यात इको-टुरिझमला बळ; १५ पर्यटनस्थळांचा कायापालट होणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यातील इको टुरिझमला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 15 ठिकाणांच्या विविध मूलभूत सुविधांसाठी सुमारे जिल्हा नियोजन समितीमधून 60 कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीव अभयारण्य, धबधबे, किल्ले, लेणी अशी गर्दी असणाऱ्या ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामांमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात धबधबे, घाट पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. भोर, राजगड, मुळशी, खेड , जुन्नर आणि मावळ या तालुक्यांमध्ये पावसाळी पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. मुळशीतील ताम्हिणी घाट, अंधारबन या ठिकाणी पावसाळ्यात भेट देणाऱ्यांची संख्या काही हजारात असते. त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यासह अष्टविनायक क्षेत्रापैकी एक असलेले मयुरेश्वर मंदिर तसेच राजगड किल्ला, जंगल सफारीचे ठिकाण असलेले कडबनवाडी, भाजे लेणी या सुमारे 15 ठिकाणी कामे करण्यास पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे. या 15 ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तिकिट काउंटर, स्वच्छता गृह, बसण्याची सुविधा, चेजिंग रुम आदी कामे केली जाणार आहे. लवकरच या कामांना मान्यता देऊन डिसेंबर महिन्याच्या आधी प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.





