Pune News : थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात.! वाहतुक दंड लोकअदालतीत उडाला फज्जा

पुणे – लोकअदालतमध्ये वाहतूक नियमभंगांवरील प्रलंबित दंड सवलतीत भरण्याच्या उपक्रमामध्ये शुक्रवारी (दि.१२) नियोजनाचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १३) शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात गर्दी झाली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनच मैदानात उतरले. मनुष्यबळ कमी आहे. मॅन्युअली कारभार सुरू आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून तुम्हाला वारंवार न्यायालय अथवा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतुक पोलीस यांच्या वतीने १० ते १३ सप्टेंबर या कालवधीत वाहतुक दंड सवलतीची लोकअदालत आयोजित केली होती. येरवडा येथे या आदालतमध्ये अचानक गर्दी झाल्याने फज्जा उडाला होता. मात्र, आज शिवाजीनगर न्यायालयात ही लोकअदालत होती. सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन यांनी त्यांना संबोधित केले.
ते म्हणाले, आम्हाला या योजनेचा सर्वांना फायदा द्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या लोकांचे चलन रजिस्टर झाले नाही. त्यांना या योजनेचा फायदा देता येत नाही. पोलिसांकडे अॉनलाईन करायचे असेल तर पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी ज्यांचे रजिस्टेशन झाले नाही. त्यांना टोकन दिले आहे.
एक महिन्यात रजिस्टर केले जाईल. उच्च न्यायालय अथवा सरकारकडून परवानगी मिळाली तर अॉनलाईन दंड भरता येणार आहे. परवानगी न मिळाल्यास न्यायालयात येऊन चलन भरावे लागेल. मागील दोन दिवसात १ कोटी ८ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. तेवढाच फायदा नागरिकांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.





