पुणे : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्जासाठी असलेली वैद्यकीय अधीक्षकांच्या सहीची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष सदस्य सिद्धार्थ अनिल गिरमे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गिरमे यांनी सांगितले की, आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी जलद गतीने होत असल्याने गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रकरणे काही तासांत मंजूर होऊन निधीही त्वरित वर्ग केला जात आहे. तसेच जिल्हानिहाय कक्ष स्थापन झाल्याने रुग्णांचा मुंबईला जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. डिजिटल डॅशबोर्डमुळे धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत खाटांची माहिती घरबसल्या रुग्णांना सहज मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, अधीक्षकांच्या सहीची अट मोठ्या शहरांतील रुग्णांना अडचणीची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुट्टीच्या दिवशी सही मिळत नसल्याने रुग्णांची प्रकरणे पुढे ढकलली जातात, परिणामी निधीच्या मदतीत उशीर होतो. ही अट शिथिल केल्यास रुग्णांची प्रकरणे त्वरित दाखल होऊन गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळेल त्यामुळे या बाबत तातडीनं निर्णय घेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.