pune news : जीवघेण्या नायलाॅन मांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पुणे : संक्रातीला जीवघेण्या नायलाॅन मांज्यामुळे गंभीर स्वरुपाच्या दुर्घटना घडल्या आहे. पंधरा ते वीस दिवसांवर संक्रात येऊन ठेपलेली असताना बंदी घातलेल्या नायलाॅन मांज्याची विक्री करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी धनकवडी भागातून अटक केली.
वेदांत राकेश गाढवे (वय १९, रा. शंकरमहाराज वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाढवे एका महाविद्यालयात शिक्षण घेतो.
तो बेकायदा नायलाॅन मांज्याची विक्री करत असल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. पुणे-सातारा रस्त्यावर पंचवटी सोसायटीच्या परिसरात पाेत्यात नायलाॅन मांज्याची विक्री करण्यासाठी आला होता.
पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेऊन गाढवेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्याची तपासणी केली. तेव्हा पोत्यात चार हजार ४०० रुपयांचा नायलाॅन मांजा आढळून आला.
पोलीस उपायु्क्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक राहुल खंडाळे, अंमलदार खुटवड, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, भुजंग इंगळे, निलेश शिवतरे, सागर सुतकर, बजरंग पवार यांनी ही कारवाई केली.
नायलाॅन मांज्यामुळे भोसरीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वार डाॅक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शनिवारवाडा परिसरात नायलाॅन मांज्यामुळे एका दुचाकीस्वार महिलेचा गळा चिरला होता. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.
संक्रातीला पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलाॅन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. नायलाॅन मांज्यामुळे गेल्या वर्षी दोन पोलीस कर्मचारी धनकवडीतील शंकरमहाराज उड्डाणपुलावर जखमी झाले होते. मांज्यामुळे पशू, पक्ष्यांना गंभीर स्वरुपाची इजा झाली होती




