पुणे – मुलीच्या भवितव्याचा विचार करत ८ वर्षांपासून सुरू असलेले वाद अभियांत्रिकी दांपत्याने मिटविले. परस्पर संमतीने दोघे वेगळे झाले आहेत. १८ वर्षाचा संसार १० दिवसात संपला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी हा निकाल दिला. वाद झाल्यानंतर मुलगी पत्नीकडे होती. निकालानुसारही ती पत्नीकडेच राहणार आहे. त्याने तिच्या भवितव्यासाठी २५ लाख रुपये दिले. दोघातील वादा मिटला. दोघांतर्फे अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अॅड. ज्ञानदा कदम यांनी सहकार्य केले. माधव (वय ४९) आणि माधवी (वय ४४) (नावे बदलली आहेत) यांचा विवाह डिसेंबर २००७ मध्ये झाला. दोघेही अभियंता असून, नोकरी करतात. सुरूवातील सुरळीत संसार सुरू होता. एक मुलगीही झाली. त्यानंतर दोघात वैचारिक मतभेद होऊ लागले. मतभेद विकोपाला गेल्यानंतर एप्रिल २०१७ पासून दोघे विभक्त राहू लागले. तो तर मध्य प्रदेश येथील इंदौर येथे निघून गेला. मात्र, दोघात कुरबुर सुरू होती. मात्र, अॅड.कांबळे-सोनावणे यांनी केलेल्या संमुपदेशनानंतर दोघे घटस्फोटास तयार झाले. घटस्फोटासाठी अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे ८ वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दोघातील मतभेदाचा परिणाम मुलीच्या भवितव्य, मनावर होत आहे. त्यामुळे वाद मिटवावेत, असे दोघांना समुपदेशनात समजावले. दोघे घटस्फोट घेण्यास तयार झाले. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले असून, मुलीचे भवितव्यही उज्वल आहे. – अॅड. राणी कांबळे-सोनावणे, अर्जदारांच्या वकील