Pune News : रस्ते खोदाईत ठेकेदाराची मनमानी ; महापालिकेची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पुणे – महापालिकेने रस्ते खोदाई केवळ मध्यवर्ती पेठांच्या परिसरापुरती मर्यादित ठेवली असतानाही ठेकेदाराने इतर भागातही रस्ते खोदल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दररोज ठरविलेल्या मीटरप्रमाणे रस्ते खोदणे अपेक्षित असताना ठेकेदाराने किलोमीटर दूरचे रस्ते खोदले, ही बाब पुराव्यासह पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
महापालिकेने ठेकेदाराला कडक शब्दांत समजपत्र पाठविले असून, पुढील काळात नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई होईल, असा इशाराही दिला आहे. दिवाळी सणानिमित्त मध्यवर्ती पेठेत रस्ते खोदाई बंद ठेवावी, असेही पत्र ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.
शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून संपूर्ण शहरात सुमारे २९९६ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास ५०० किलोमीटरची खोदाई शहरात केली जाणार आहे. महापालिकेकडून या खोदाई करणाऱ्या कंपनीस आतापर्यंत केवळ २८ किलोमीटरच्या खोदाईस मान्यता दिली आहे.
मात्र, संबंधित काम देण्यात आलेल्या ठेकेदाराकडून महापालिकेस कोणतीही कल्पना न देता सरसकट कोणत्याही भागात खोदाई सुरू केली आहे. त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर आता जागे झालेल्या महापालिकेने संबंधित ठेकेदारास समजपत्र देत दिवाळीच्या कालावधीत काम बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.





