Pune News : आयुक्तांचे आदेश वाऱ्यावर..; सिंहगड रस्त्यावरील प्रकार ; फ्लेक्स काढले, सांगाडे तसेच ठेवले

पुणे – शहरात मुख्य रस्ते, चौक, पदपथ, पथदिव्यांवर सांगाडे उभारून लावण्यात आलेले फ्लेक्स काढण्यासह बांबूचे सांगाडेही तोडण्याचे व दररोज पाच गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, महापालिकेचे आदेश डावलत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने एकही गुन्हा दाखल केलेला नाही तसेच फ्लेक्स काढण्यात आल्यानंतर त्यासाठी उभारलेले सांगाडेही तसेच ठेवले असून, या सागांड्यांवर पुन्हा नवीन जाहिराती लावण्यात आल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी महापालिकेचा ‘फलक उभारल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा बोर्डही असून, त्या बोर्डच्या शेजारीच ही अनधिकृत जाहिरातबाजी सुरू असून, क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिवसभर खडकवासला मतदारसंघात असून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याने तसेच महापालिका निवडणुका असल्याने या अनधिकृत फ्लेक्सबाजीची दखल थेट महापालिका आयुक्तांनी घेतली तसेच तातडीने शहरातील सर्व अनधिकृत जाहिराती काढण्याचे आदेश दिले.
त्यानंतर प्रशासनाने मागील दोन दिवसांत जवळपास ५० हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून केवळ तीन तक्रारी देण्यात आल्या आहेत तर अनेक अनधिकृत जाहिराती तशाच ठेवल्या असून, त्यांचे सांगाडेही काढलेले नाहीत. त्यामुळे आता त्यावर पुन्हा जाहिराती लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे, प्रशासन नेमके कोणासाठी काम करतयं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.





