Pune News : बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला
मॅट्रोमनी साईटवरून झालेल्या ओळखीतून तरूणीला पिस्तुल दाखवून धमकावून वारंवार बलात्कार करणाऱ्याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी यांनी फेटाळला.

Pune News – मॅट्रोमनी साईटवरून झालेल्या ओळखीतून तरूणीला पिस्तुल दाखवून धमकावून वारंवार बलात्कार करणाऱ्याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी यांनी फेटाळला. अशोक वसंत बढे (वय ३३, रा. नऱ्हे, मूळ. पिंपळनेर, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे.
त्याच्या जामिनास सरकारी वकील ॲड. पुष्कर सप्रे आणि फिर्यादीतर्फे ॲड. श्रीकृष्ण घुगे यांनी विरोध केला. याबाबत बारामती तालुक्यातील २८ वर्षीय तरूणीने नऱ्हे पोलिसात फिर्याद दिली आहे.
अशोक याने तरूणीचा विश्वास संपादन करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिस्तुल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत शहरातील आंबेगाव भाग आणि बारामती तालुक्यातील विविध लॉजवर नेऊन बलात्कार केला.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लॉजमधील नोंदी व सीसीटीव्ही चित्रणाच्या माहिती मिळविण्यात येत आहे. त्याचा मोबाईल जप्त केला असून, मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायसहाय्यक वैद्न्यानिक प्रयोगशाळा येथे जमा आहे. त्याने पीडितेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली. २९ मार्च ते १३ जुलै या कालावधीत घडलेल्या गुन्ह्याबाबत बढे याला अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर फेटाळला.





