pune news : मार्केट यार्डात देवगड हापूसची आवक

गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच आवक
पुणे : मार्केट यार्डात देवगड हापूसची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच या हंगामपूर्व हापूसची आवक झाली आहे. जानेवारीमध्ये हंगामपूर्व हापूस आंब्यांची तुरळक आवक होत असते.
तर, फेब्रुवारी महिन्यात हंगाम सुरू होत असतो. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील शेतकरी जयेश कांबळी यांच्या शेतातून ही पहिली पेटी मार्केट याडात दाखल झाली. “मे.नामदेवराव रामचंद्र भोसले’ या अनिरूद्ध ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या फर्मवर ही आवक झाली. आडते युवराज काची यांनी लिलावात ही पेटी विकत घेतली.
या पेटीत आंब्याचे 66 नग होते. यावेळी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, यशवंत कोंडे, गणेश शेडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कांबळी यांनी ऑक्टोबर महिन्यात मोहोर जपलेल्या निवडक झाडातून ही आवक झाली. त्यांची 400 हापूसची झाडे असून, टप्प्याटप्प्याने आवक होईल, असे त्यांनी सांगितले. मागील वर्षी जानेवारी महिन्यात हापूसची पहिली आवक झाली होती. ती यंदा पंधरा दिवस आधीच सुरू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.





