Pune News : तब्बल ८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी वाया; रस्त्याला आले नदीचे स्वरूप

पुणे – पुणे बाजार समितीच्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व खराब झाल्याने सुमारे ८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. तब्बल सुमारे दोन ते अडीच तास पाणी वाहून गेल्याने मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
पुणे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयालगत पाण्याची टाकी उभारली आहे. सुमारे वर्ष ते दीड वर्षापूर्वीच या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले. या टाकीसाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च आला.
या पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता वरच्या भागात २० लाख लिटर आणि तळभागात २० लाख लिटर अशी एकूण ४० लाख लिटर इतकी आहे. जून महिन्यापासून पाण्याच्या टाकीचा वापर सुरू केला.
या टाकीत महापालिकेच्या लाईन वरून पाणी घेतले जाते. या पाण्याच्या टाकीद्वारे संपूर्ण गुळ भुसार विभाग, फुलांचा बाजार, फळे व भाजीपाला, कांदा-बटाटा, पान व केळी बाजारात पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो.
गुरुवारी सुमारे १२ च्या सुमारास अचानक टाकीचा व्हॉल्व मधून प्रचंड पाण्याची गळती सुरू झाली. टाकीत असलेले तब्बल सुमारे ८ ते १० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. या
मुळे बाजार घटकांच्या पाणी पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला. त्यांनतर रात्री तळभागातील टाकीतील पाणी वरच्या टाकीत चढवून पाणीपुरवठा करण्यासाठी सुरुवात केली.
याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर म्हणाले, पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वची दुरुस्ती करत असताना अचानक व्हॉल्व तुटल्याने ही पाणी गळती झाली. वेळीच यंत्रणा कामाला लावून व्हॉल्व दुरुस्तीचे सायंकाळपर्यंत काम पूर्ण करण्यात आले.





