पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी पुणे – कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळविरुद्ध दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरत असल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घायवळ हा २०२० पासून दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच टेलिकम्युनिकेशन ॲक्ट २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. पोलिसांची संशयास्पद भूमिका घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवताना घायवळ ऐवजी गायवळ असे नाव वापरले आहे. घायवळच्या पारपत्राची पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.