Pune news : “आनंदने मला शहाजी राजेंसारखा अभिमान वाटण्याचे सौभाग्य दिले” – दादा देशपांडे
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्यावर झालेल्या भेटीत शहाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कामगिरीबद्दल असमाधानी राहत कामगिरी सतत उंचावत ठेवण्याचा सल्ला दिला.

Pune news : स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्यावर झालेल्या भेटीत शहाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कामगिरीबद्दल असमाधानी राहत कामगिरी सतत उंचावत ठेवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे आनंद परदेशात उच्च शिक्षण घेवून भारतात परतल्यावर मी सुद्धा त्याला या गोष्टीतून प्रेरणा घेण्याची सूचना केली.
आयुष्यात मी छत्रपती शिवरायांसारखी कामगिरी करू शकलो नाही. परंतु, आनंदने उत्तुंग कामिगिरी करत मला शहाजी राजेंसारखा अभिमान वाटण्याचे सौभाग्य दिले, असे गौरवोद्गार दादा देशपांडे यांनी आपले सुपुत्र व पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक आनंद देशपांडे यांच्या विषयी काढले.
पुण्यातील लिगल-लॉजिक या १२५ हून अधिक तज्ज्ञ वकिलांची टीम असलेल्या व विविध क्षेत्रात कायदेविषयक सल्ला व सेवा देणाऱ्या संस्थेच्या सुमा सेंटर, एरंडवणे येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन दादा देशपांडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास आनंद देशपांडे, वेल्थ मॅनेजर्सचे संचालक भरत फाटक, पित्रे व्हेंचर्सचे अध्यक्ष अजय पित्रे व लिगल-लॉजिकचे सह-संस्थापक विवेक साधले, श्रीधर कुलकर्णी आणि विकास अगरवाल उपस्थित होते.
“छोट्या उद्योजकांना मदत करा व जास्तीत जास्त लघु व मध्यम स्वरूपाच्या संस्थाना पुढे जाण्यासाठी मदत करा”, असे आवाहन देखील यावेळी दादा देशपांडे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी बोलताना आनंद देशपांडे म्हणाले, “एखाद्या संस्थेची कार्यालये ही तिच्या वाढीचे प्रतीक असतात. मोठे कार्यालय असणे, अनेक लोक काम करताना दिसणे म्हणजे संस्था प्रगतीपथावर आहे, हे स्पष्ट होते.
लिगल-लॉजिकने यापुढे आणखी कार्यालये सुरू करताना ती केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहरांमध्येही सुरू करण्याचा विचार करायला पाहिजे. पुण्यातून उभी राहणारी आणि जागतिक स्तरावर नाव कमावणारी विधी संस्था उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल करायला हवी.”
लिगल-लॉजिकचे सह-संस्थापक विवेक साधले म्हणाले की, वाढत्या वकिलांच्या टीमला अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि भारतासह भारतात व्यवसाय असलेल्या परदेशी ग्राहकांना अधिक सक्षम सेवा देणे या उद्देशाने हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या विस्तारामुळे, विलीनीकरण व अधिग्रहण, भांडवली बाजार, कॉर्पोरेट व व्यावसायिक कायदा, डेटा गोपनीयता, विमा सल्ला, सॉफ्टवेअर अनुपालन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, रोजगारविषयक कायदे, स्थावर मालमत्ता, बौद्धिक संपदा हक्क, प्रायव्हेट क्लायंट प्रॅक्टिस, लवाद, कौटुंबिक कायदा आदी प्रमुख क्षेत्रांतील कामकाजाची क्षमता आणखी वाढणार असल्याचे देखील साधले यांनी नमूद केले.
वर्ष २०१३ मध्ये विकास अगरवाल, श्रीधर कुलकर्णी आणि विवेक साधले यांनी लिगल-लॉजिकची स्थापना केली. कायद्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहत प्रभावी आणि परिणामकारक उपाययोजना देण्यावर संस्थेचा भर राहिला आहे.
आज १० भागीदार आणि १२५ हून अधिक वकिलांची टीम असलेली ही संस्था कॉर्पोरेट, बिगर-वाद तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये आपल्या आशीलांचे प्रतिनिधित्व करते. विषयातील सखोल ज्ञान, पारदर्शकता आणि योग्य संवादशैली यासाठी लिगल-लॉजिकचे वकील ओळखले जातात.
सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत लिगल-लॉजिकने कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने पाठबळ दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याबरोबरच, कायदे क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांतील नव्या घडामोडींची माहिती त्यांना उपलब्ध करून देण्यात संस्थेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
तसेच विविध नामांकित विद्यापीठांशी सहकार्य करून कायदे क्षेत्र आणि तंत्रज्ञान शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचे कामही लिगल-लॉजिकने केले आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांना कायदे क्षेत्रासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.





