Pune News | अक्षय कुमार आणि अर्शद वारसी कोर्टात? ; ‘जॉली एलएलबी ३’वर वकिलांचा आक्षेप

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जॉली एलएलबी ३ या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कलाकार व निर्मात्यांनी थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी पुण्यातील दोन वकिलांनी दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख कलाकार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना समन्स बजावले आहेत.
दि. २८ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या निर्मात्यासह अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात उपस्थित राहून त्यांना याबाबत म्हणणे दाखल करावे लागणार आहे. ॲड. वाजेद खान (बीडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी हे प्रकरण दाखल केले होते. त्यामुळे जॉली एलएलबी ३ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
या चित्रपटात अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मलीन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान करण्यात आला आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील, न्यायाधीस करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर असभ्य विनोद करणाऱ्या चित्रपटाला बंदी घालावी, यासाठी ॲड. वाजेद खान (बिडकर) व ॲड. गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यावर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) जे. जी. पवार यांनी अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि निर्मात्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.





