Pune News | पुणे’एम्स’ प्रकल्पासाठी अजित पवारांचे पुढाकार ; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आरोग्य सुविधांमध्ये गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने, पुण्यातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ही वैद्यकीय संस्था स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. पुण्यात एम्स संस्था स्थापन झाल्यास रुग्णांना उपचारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनालाही मोठी चालना मिळेल.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक झाली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या. पुणे हे राज्यातील एक प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, येथे उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांची नितांत गरज आहे. नागपूर येथे एम्सची स्थापना झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांसाठी पुणे अथवा मुंबई किंवा इतर दूरच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य सुविधा सुधारण्याच्या योजनांवर चर्चा झाली. याच बैठकीत, पुण्यात एम्स संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावावर भर देण्यात आला. पवार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करण्यास सांगितले आहे. पुण्यात एम्स संस्था स्थापन झाल्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
पुण्यासह संपूर्ण राज्यातील रुग्णांना राष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय उपचारांचा लाभ घेता येईल. ग्रामीण भागातील रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात एम्स संस्था स्थापन करण्याचा हा प्रयत्न शहराच्या भविष्यातील विकासासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून कधी मंजुरी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एम्स संस्था स्थापन झाल्यास फायदे..
– ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेचा होणार लाभ
– रुग्णांना कमी खर्चात, अत्याधुनिक उपचार मिळतील
– डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी
– नवीन औषधे, उपचार पद्धती, वैद्यकीय संशोधनाला गती





