दिवाळीनिमित्त स्वारगेट, वाकडेवाडी, पिंपरी-चिंडवड येथून नियोजन पुणे – दिवाळीला पर्यटनासह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी उद्या (दि. १५) पासून पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि पिंपरी-चिंचवड येथून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वारगेट येथून नियमित गाड्यांसह कोल्हापूर, जळगाव, मंगळवेढा यांसह कोकणात जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. वाकडेवाडी येथून मराठवाडा आणि खान्देशात जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. नोकरी, व्यावसाय, शिक्षणानिमित्त पुण्यात राहात असलेले अनेक परिवार दिवाळीला गावी जातात. दि. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी शाळांच्या परीक्षा संपताच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकावर गर्दी वाढते. त्यानुसार उद्यापासून जादा गाड्यांचे नियोजन केले असून, दि. १६ ऑक्टोबरपासून गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा नियोजित बससह ५९८ जादा बसचे नियोजन केले असून, त्यामध्ये मराठवाडा, विदर्भासाठी पिंपरी-चिंचवड आणि वाकडेवाडी आगारांतून जादा बस सोडण्यात येणार आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासाठी स्वारगेट आगारातून बस सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड येथून ३९६, तर वाकडेवाडी येथून ८० बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट एसटी स्थानक येथून ११३ जादा बस सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण भागात सोडण्यात येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ एसटीचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गाड्यांचे बुकिंग झाले असून, त्यानुसार एसटीकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. आज दिवसभर स्थानकावर फारशी गर्दी नसली, तरी दि. १७ पासून दिवाळी सुरू होते. त्यामुळे दि. १६ पासून गाड्यांना गर्दी वाढेल. विशेषत: शुक्रवारी रात्रीपासून पुढील दोन दिवस स्थानकावर वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षारक्षकांसह कर्मचाऱ्यांची अधिकची टीम तयार केली आहे. प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केली असून, चौकशी केंद्रेही वाढवली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.