पुणेकरांवर वाहनचोर शिरजोर

पुणे, (संजय कडू) – गेल्या दहा महिन्यांत तब्बल साडेअकराशेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावरून चोरीला गेली आहेत. म्हणजेच, पुणे शहरात दिवसाला सरासरी 4 वाहनांची चोरी होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. विशिष्ट कंपन्यांच्या “रिसेल व्हॅल्यू’ असलेल्या वाहनांकडेच चोर आपला मोहरा वळवत आहेत.
या कंपन्यांना त्यांच्या वाहनांची लॉक सिस्टिम सक्षम बनवण्यासाठी पोलिसांनी कळवले आहे. मात्र, तरीही सामान्य पुणेकरांच्या डोक्यावर वाहनचोरीची टांगती तलवार कायम आहे. तर, नागरिकांनी वाहनांना जीपीएस सिस्टीम किंवा डिजिटल लॉक बसवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्या आणि वस्त्यांलगत रस्त्यावरील वाहने बनावट चावीचा वापर करून चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्येही . वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरासमोर वाहन पार्क करण्यास जागा नसल्याने ते आपली वाहने सार्वजनिक रस्त्यावर उभी करतात. याचाच फायदा वाहनचोर घेतात.
तर दुसरीकडे सुरक्षा रक्षक नसलेल्या सोसायट हेरुन वाहने चोरली जातात. पोलिसांनी अशा वाहन चोरीच्या घटनांचे वर्णन “रहिवासी क्षेत्रातून झालेल्या चोऱ्या’ असे केले आहे. पुणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ-5 हडपसर, कोंढवा, मुंढवा, वानवडी परिसरांतून दि.1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत 401 वाहने चोरीला गेली आहेत. खासगी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे (जसे की बाग, सरकारी कार्यालये आणि इतर), एसटी स्टॅंड, रुग्णालये, मंदिरे, शाळा/कॉलेज, व्यापारी संकुल ही वाहनचोरीची इतर ठिकाणे आहेत. बॅंक किंवा एटीएम परिसरातून वाहन चोरीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात.
दशकभरापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनचोरी घटना वाढल्या होत्या. पण, आता येथील रहिवाशांनी सोसायटी आवारात सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच सुरक्षा रक्षकही नेमले आहेत.
पोलिसांनी शहरातील 67 ठिकांणे शोधून काढले आहेत जिथून वारंवार वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवर 25 हून अधिक गुन्हेगार आहेत जे नियमितपणे रस्ते किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमधून वाहने चोरतात. त्यांना अनेकदा अटकही झाली आहे. वाहनचोरीत सहभागी असलेले चोरटे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, मराठवाड्यातील जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थेट विक्री करण्यासाठी वाहने चोरतात. दुसरे म्हणजे, त्यांच्या सुट्या भागांसाठी वाहनांची चोरी केली जाते आणि अशा वेळी वाहनांची मोडतोड करून गॅरेज मालकांना सुटे भाग विकले जातात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.
वाहन चोरीची कारणे
*गृहनिर्माण सोसायट्यांमधील वाहन पार्किंगचे अयोग्य व्यवस्थापन
*सुरक्षा रक्षक नियुक्त नसलेल्या सोसायट्या
*इग्निशनची चावी विसरणे
*दुचाकींचे जुने व जीर्ण झालेले कुलूप न बदलणे
*गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर सीसीटीव्ही नसणे
वाहन चोरीच्या वेळा
*बहुतांश वाहने सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.
*सर्वांत कमी वाहने सकाळी 6 ते सकाळी 9 दरम्यान चोरीला गेल्याची नोंद आहे.
हौसेसाठीही वाहने चोरली जातात आणि त्यांचे इंधन संपेपर्यंत त्यांचा वापर केला जातो आणि ही वाहने शहरातील रस्त्यावर निर्जन स्थितीत सोडली जातात. नाकाबंदी कारवाईदरम्यान वाहनांची कागदपत्रे तपासणे, हॉटस्पॉटवर पेट्रोलिंग, जंक्शनवर अचानक तपासणी, शहरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर वाहनांची तपासणी करणे यासारख्या वाहन चोरी शोधण्यासाठी आम्ही अनेक उपाय अवलंबले आहेत. शहराच्या सीमेवर असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत आणि त्यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे अशा सोसायट्यांमधून चोरटे वाहने चोरतात.
– श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
2021 मध्ये चोरीला गेलेल्या वाहनांचे प्रकार
दुचाकी 745, तीनचाकी 38, चारचाकी 32, जड वाहने 22,





