Pune News : ४० दिवसांचे लग्न, ४० वर्षांची पोटगी? सेव्ह इंडियन फॅमिलीचे वैवाहिक कायद्यात सुधारणांचे अभियान
‘४० दिवसांचे लग्न, ४० वर्षांची पोटगी?’ या लक्षवेधी घोषवाक्याद्वारे वैवाहिक कायद्यांमधील कथित असमतोल आणि पुरुषांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Pune News : अल्पकाळ टिकलेल्या विवाहानंतरही अनेक वर्षे पोटगी द्यावी लागण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन या संस्थेने रविवारी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात जनजागृती अभियान राबविले.
‘४० दिवसांचे लग्न, ४० वर्षांची पोटगी?’ या लक्षवेधी घोषवाक्याद्वारे वैवाहिक कायद्यांमधील कथित असमतोल आणि पुरुषांच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
या अभियानात ‘ॲलिमनी गोपाळ’ हे प्रतीकात्मक पात्र विशेष आकर्षण ठरले. वैवाहिक वादांमध्ये अडकलेल्या पुरुषांच्या समस्या आणि पोटगीच्या दीर्घकालीन आर्थिक दायित्वांकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोटगी निश्चित करताना केवळ विवाह झाला होता एवढाच निकष न ठेवता विवाहाचा कालावधी, दोघांचे उत्पन्न, मालमत्ता, आर्थिक क्षमता, रोजगाराच्या संधी आणि प्रत्यक्ष आर्थिक गरज यांचा विचार व्हावा, अशी मागणी संस्थेने केली.
शिक्षित आणि रोजगारक्षम जोडीदाराला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देत कालमर्यादित पोटगीचे धोरण स्वीकारावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
तसेच विवाहापूर्वीच आर्थिक जबाबदाऱ्या, मालमत्ता, कर्ज आणि विभक्त होण्याच्या परिस्थितीतील आर्थिक तरतुदी निश्चित करण्यासाठी विवाहपूर्व करारांना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या कथित गैरवापराला प्रतिबंध, पोटगीच्या आदेशांचे वेळोवेळी पुनरावलोकन, दोन्ही जोडीदारांच्या समान आर्थिक जबाबदाऱ्या तसेच पुरुषांसाठी समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
संघटनेचे सहसंस्थापक राजेश वाखारिया, महाराष्ट्र समन्वयक समीर गोयल आणि समुपदेशक योगेश गोराणे यांनी यावेळी भूमिका मांडली. संस्थेच्या रोहीत जोशी व आदी कार्यकर्त्यांनी नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून जनजागृती केली.





