Pune News : स्व. राकेश जैन यांच्या स्मृतिदिनी ४७ वे रक्तदान शिबिर; १०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
स्व. राकेश देवीचंद जैन यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि श्री जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी ४७ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Pune News : स्व. राकेश देवीचंद जैन यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि श्री जिन कुशल सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै २०२६ रोजी ४७ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
भगवान महावीर यांचे स्मरण करून शिबिराचे उद्घाटन पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष देवीचंद जैन यांच्या हस्ते व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदानापूर्वी करण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य तपासणीमुळे रक्तदात्यांना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते.
तसेच विश्वस्त राजेशभाई शहा यांनी रक्ताची वाढती मागणी व रक्ताचा तुटवडा असतानाही राकेश जैन मेमोरियल रक्तकेंद्राने गरजू रुग्णांपर्यंत कायम रक्त व रक्त घटकांची पूर्तता केली.
केवळ पूना हॉस्पिटलच नव्हे, तर परिसरातील अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांना रक्त व रक्तघटकांचा अखंड पुरवठा करून महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
स्व. राकेश जैन यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या रक्तकेंद्रामुळे आजवर असंख्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे. विशेषतः डेंग्यूसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आवश्यक प्लेटलेट्स, रक्त व इतर रक्तघटक वेळेवर उपलब्ध करून देत रुग्णांना तातडीचे उपचार मिळवून देण्यात रक्तकेंद्राने मोलाची भूमिका बजावली आहे.
या रक्तदान शिबिरात एकूण १०१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या प्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त राजेशभाई शाह, भबुतमल जैन, पूना हॉस्पिटलचे सीईओ डॉ. रवींद्रनाथ, मेडिकल डायरेक्टर ले. कर्नल (निवृत्त) डॉ. गिरीश देशमुख तसेच जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन व कार्यकारी परिवार उपस्थित होते.





