Pune News | गुंडांची गाठ, पोलिसांची माघार..पुणेकरांचा सवाल ; वाढत्या गुन्हेगारीवर राजकारणी शांत का?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शांत, सुरक्षित असे पेन्शनरांचे पुणे असा शहराचा लौकिक हरवला आणि मेट्रो सिटीत परिवर्तन झाले त्यालाही काही वर्षे उलटून गेली आहेत. पुणेकरांच्या सुरक्षेच्या चिंधड्या उडत असणाऱ्या अनेक घटना घडवणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या डोकं वर काढत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गोळीबार असे सामान्यांचे थरकाप उडवणारे प्रकार भरदिवसा घडत असून शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. असे असताना किरकोळ कारणावरून पोलिसांवर ताशेरे ओढणारे राजकारणी वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेची टांगली गेलेली लक्तरे पाहून राजकारणी मात्र गप्प आहेत.
त्यांच्या या शांततेचे कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणूक.या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांपेक्षा गुंडांची साथ राजकीय पक्षांसाठी जास्त महत्त्वाची ठरते. दोन ते पाच हजार मतांचा गठ्ठा हे या शहरातील गुंडांचे बळ आहे. अनेक गुंडांच्या टोळी प्रमुखांची घरेच माजी नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवारांनी गाजवलेली आहेत. काहींना तर विधानसभेच्या वेळीच पॅकेज डीलमध्ये हाताशी धरले गेले आहे.
धडाडी आणि माघार..
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यांसारख्या कुख्यात गुंडांना रांगेत उभं करून दम दाखवला. सामान्य नागरिकांनी कारवाईचं स्वागतही केलं. ही धडाडी फार काळ काही टिकली नाही.एका प्रकरणात कोथरुडमधील गुंडाला गुन्हे शाखेत बोलावले असता, एका बड्या नेत्यानेच अधिकाऱ्यांना सुनावल्याने गुंडाला खुर्चीवर बसवून नावापुरती चौकशी करावी लागली. एवढंच नव्हे, एका महिला अधिकाऱ्याने धाडसी कारवाई केली, तर तिच्यावर एवढा मानसिक दबाव टाकला गेला की ती दीर्घकालीन रजेवर गेली.
नंतर तिची तडकाफडकी साईड ब्रँचला बदली झाली.कोथरुड परिसर हा बहुतांश टोळ्यांचा अड्डा आहे. पोलिसांनी मोक्का लावले तरी हे गुंड काही दिवसांत जामिनावर बाहेर येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनीच वकिलांची फौज ठेवून गुंडांना सोडवण्याची सोय केली आहे. त्यामुळे पोलिसांना मोठ्या गुंडावर कारवाई करायची असेल तर आधी मंत्रालयात फोन फिरवावा लागतो अशी परिस्थिती आहे.
गुन्हेगारांना राजकीय कवच..
आंदेकर टोळीने सप्टेंबरमध्ये आयुष कोमकर याचा खून केला.टिपू पठाणवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमीन बळकावणे असे तब्बल २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ टोळीने तरुणावर गोळीबार करून दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. हे सर्व घडत असताना, पुण्याच्या राजकीय व्यासपीठावर मात्र या गुंडांसोबत काही लोक नेतेमंडळी झळकत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांचा सध्या प्रश्न एकच आहे , तो म्हणजे, साहेब, दादा, ताईं गेले कोठे? गुंडगिरीवरचं मौन नेमकं कोणासाठी आणि कशासाठी?





