PUNE: किल्ले सिंहगडावर नववर्षाचे सेलिब्रेशन; हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून दंड वसूल

पुणे – ‘थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी तब्बल सहा हजारांहून अधिक पर्यटकांनी पूर्वसंध्येलाच सिंहगड गाठला आणि तेथे गडावरच नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष केला. हा जल्लोष करताना नियमाचे भंग केलेल्यांना मात्र वनविभागाने खाक्या दाखवला आणि त्यांच्याकडून अडीच हजार रुपये दंडही वसूल केला.
३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला सिंहगडावर पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे येथे गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली. गडावर येणार्यांमध्ये तळीरामांचाही समावेश होता. एकूणच या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आणि विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या मदतीने प्रत्येक वाहनाची तपासणी केली. त्यात पाच वाहनांमधून दारू, सिगारेट, तंबाखू आदी वस्तू जप्त केल्या असून, त्यांच्याकडून अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सिंहगड किल्ल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी दिली.
३१ डिसेंबर रोजी गडावर येणाऱ्या ६४९ चारचाकी आणि एकहजार ६४० दुचाकींना प्रवेश देण्यात आला. यावेळी सहा हजारांहून अधिक लोकांनी गडाला भेट दिली. यामध्ये दारू आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करणाऱ्या पाच चारचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून प्रत्येक वाहनाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच वनविभागाने इतर परिक्षेत्रांतून वनक्षेत्रात रात्रीची गस्तही घातली. परंतु जंगलभागात कोणीही पार्टीसाठी घुसखोरी केलेले दिसून आले नाही. त्यामुळे या भागात कोणतीही कारवाई झाली नाही.





