Pune: विद्यार्थ्यांना उद्योगभिमुख शिक्षण देण्याची गरज – संदीप कदम

पुणे – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोहगाव येथील श्री संत तुकाराम विद्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या एआय इंटरनॅशनल इन्होवेशन प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सिनेट सदस्य संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
एअर गुरूजी इंटरनॅशनल सीईओ प्रताप पवार, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खवले, मुख्याध्यापक शैलजा गायकवाड, उपमुख्याध्यापक संध्या गायकवाड, पर्यवेक्षक एस. डी. चव्हाण, प्राचार्य मुंढे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योगभिमुख शिक्षण देण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या एआय इन्होवेशन लॅब महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत संदीप कदम यांनी व्यक्त केले.
या वेळी प्रतिमापूजन, रांगोळी व चित्रकला प्रदर्शन, निबंध स्पर्धा यासह दहावी आणि बारावीतील प्रथम क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर आणि ड्रोन कॅमेरा या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील लाडके, सूत्रसंचालन उमेश घुंडरे, तर आभार एस. डी. चव्हाण यांनी मानले.





