पुणे | मुळा, मुठा नदी संवर्धनासाठी जनआंदोलनाची गरज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- नदीपात्र संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारले पाहिजे. पुण्यात मुळा आणि मुठा नदीपात्राच्या संवर्धनासाठी जन आंदोलन उभारण्याची गरज असल्याची भूमिका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी मांडली.
शहरातील मुळा आणि मुठा नदी पात्राच्या संवर्धनासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी, सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी आज एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्राला ठाकरे उपस्थित होते. पुण्यातील पर्यावरण या विषयावर त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केल आणि त्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधला.
मागील काही वर्षांत नदीचे पात्र दोन्ही बाजूंनी भर घालून लहान करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे. या नदीचे पात्र पूर्वीसारखेच राहिले पाहिजे आणि त्याचे खोलीकरण देखील झाले पाहिजे. यासाठी शहरातील पर्यावरण प्रेमी, सर्व सामान्य नागरिक आणि सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
सत्ताधारी पक्षांवर टीका करताना ठाकरे यांनी नदीपात्रात सुरू असलेल्या चुकीच्या कामांकडे लक्ष वेधले. नेमके नदीपात्रात कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. त्याबाबत सादरीकरण केले पाहिजे आणि ही कामे रोखली पाहिजेत, असा सल्ला पर्यावरणप्रेमींना दिला.
आपण गुजरातमधील ठेकेदार, सल्लागाराचा विकास करतोय की, पुणेकर नागरिकांचा विकास करतोय, याबाबतचा आपण विचार करण्याची गरज असून जर ही कामे रोखली नाहीत, तर नदीपात्र संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारले पाहिजे, असे ठाकरे यांनी सुचवले.





