Pune Nashik Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम राहणार? दिलीप वळसे पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडे मोठी मागणी
Pune Nashik Railway: चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेरमार्गेच रेल्वे व्हावी; उत्तर-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी मूळ मार्ग कायम ठेवण्याचा आग्रह.

Pune Nashik Railway – पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा चाकण–खेड–आंबेगाव–जुन्नर–संगमनेर–नाशिक हा मूळ प्रस्तावित मार्ग कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. रांजणगाव येथे झालेल्या भेटीत त्यांनी यासंदर्भातील सविस्तर निवेदन बुधवार, दि.१७ रोजी सादर केले. निवेदनासोबत माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मोहन फडणीस यांनी तयार केलेले संशोधनपर लेख आणि तांत्रिक अभ्यास टिपणही जोडण्यात आले.
खोडद येथील विशाल मीटर-तरंगलांबी रेडिओ दुर्बीण संशोधन प्रकल्पाचे महत्त्व अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करताना, या संशोधन केंद्राचे संरक्षण आणि रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी ही दोन्ही उद्दिष्टे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साध्य होऊ शकतात, असे निवेदनात म्हटले आहे. विद्युतचुंबकीय सुसंगतता तंत्रज्ञान, प्रकाशतंतू दळणवळण व्यवस्था, संरक्षित रेल्वे विद्युत प्रणाली, सातत्यपूर्ण रेडिओ हस्तक्षेप निरीक्षण, विशेष संकेत गाळणी तंत्रज्ञान तसेच संवेदनशील भागांमध्ये बोगदे उभारणे यांसारख्या उपाययोजना अभ्यासात सुचविण्यात आल्या आहेत.
जगातील विविध देशांतील उदाहरणांचा दाखला देत वैज्ञानिक संशोधन आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था यांचा समतोल साधता येऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, संगमनेर आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा रेल्वे प्रकल्प मूळ मार्गानेच मार्गी लावावा, यासाठी शासन व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
“खोडद येथील वैज्ञानिक संशोधन प्रकल्पाचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन केंद्राचे हित जपत पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गाने पूर्ण करणे शक्य असून त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
– दिलीप वळसे पाटील,माजी गृहमंत्री.
“पुणे–मंचर–नाशिक रेल्वे मार्गासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता इतर लोकप्रतिनिधींनीही एकत्र येऊन प्रयत्न करावेत.”
– राजेंद्र चौधरी,उपाध्यक्ष पुणे-नाशिक रेल्वे कृती समिती.




