Pune Nashik Railway: शिवरायांचे जन्मस्थान रेल्वेच्या नकाशावरून गायब? नवीन मार्गामुळे ‘या’ महत्त्वाच्या ठिकाणांना फटका

प्रभात वृत्तसेवा
मंचर – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी लोकसभेत पुणे – अहिल्यानगर-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी तीर्थक्षेत्राच्या महत्त्वामुळे त्या मार्गे नेण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, यामुळे पूर्वी प्रस्तावित असलेला पुणे-नाशिक थेट रेल्वे मार्ग रद्दबातल ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हा जुना मार्ग श्रीक्षेत्र भीमाशंकर, अष्टविनायकातील लेण्याद्री व ओझर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याजवळून जाणार होता.तो रेल्वे मार्ग आता बदल्याने धार्मिक, ऐतिहासिक आणि विकासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शिर्डी हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असले तरी शिवनेरी, भीमाशंकर व अष्टविनायक ही स्थळे ऐतिहासिक, धार्मिक आणि राष्ट्रीय अस्मितेची प्रतीके आहेत. अशा स्थळांना डावलून रेल्वे मार्ग अहिल्यानगरमार्गे नेण्यात आल्याने विकासाच्या संधींपासून खेड, आंबेगाव, जुन्नर परिसर वंचित राहणार आहे.
या भागातील पर्यटन, व्यापार, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींवर मोठा परिणाम होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.अहिल्यानगर मार्गे होणारी रेल्वे मार्गाचा तातडीने पुनर्विचारात घ्यावा आणि जुना पुणे–नाशिक रेल्वे मार्ग पुन्हा मंजूर करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
“पुणे–नाशिक थेट रेल्वे मार्ग आमच्यासाठी जीवनवाहिनी ठरला असता. शिवनेरी, भीमाशंकर, लेण्याद्रीसारखी स्थळे असतानाही मार्ग बदलणे अन्यायकारक आहे. हा निर्णय मागे घ्यावा.”
– नवनाथ हुले, अध्यक्ष, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, मंचर.
“आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे. जुना रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटन व रोजगार वाढला असता.”
– मारुती बढेकर,पोल्ट्री व्यावसायिक, जारकरवाडी- वैदवाडी.
“रेल्वे मार्गासाठी पूर्वी सर्वेक्षण, भूसंपादन व काही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे अचानक मार्ग बदलणे हे अन्यायकारक आहे.”
– जगदीश अभंग,माजी सरपंच, अवसरी खुर्द.





