पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुणे : पुणे- नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेमध्ये आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले, या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर अडीच ते तीन तासांमध्ये पूर्ण होणार आहे.
परिणामी दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यान एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. अनेक लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार असून, रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे, तसेच काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व विकास पथावर असलेली गावेही या महामार्गाने जोडली जाणार आहेत.
शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही
मंत्री भुसे म्हणाले, की या प्रकल्पात जिराईत व बागायती जमिनींचे भूसंपादन होणार असून, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक टप्पा पार पडणार असून, कायदेशीर नियमानुसार न्याय्य मोबदला दिला जाणार आहे.




