Adarsh Shala Yojana – शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील ४०५ सरकारी शाळांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता दिली आहे. विकसित महाराष्ट्र-२०४७ या व्हिजन डॉक्युमेंटमधील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण म्हणता येईल. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत निवडलेल्या ४०५ शाळांमध्ये प्रामुख्याने समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश केला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता नव्या ४०५ शाळांमुळे राज्यातील आदर्श शाळांची व्याप्ती वाढणार आहे. विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत विनाअडथळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्या आणि इतर सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री सर्व शाळांमध्ये मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि फिल्टरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय प्राधान्याने केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एका आदर्श शाळेची निवड करून तिला क्रीडा प्रबोधिनी म्हणून विकसित केले जाईल. या ४०५ शाळांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असून, शिक्षण आयुक्तांच्या मान्यतेनंतर या कामांना तातडीने सुरुवात होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असलेली ही योजना केवळ शाळांचे नूतनीकरण नसून, महाराष्ट्राच्या शैक्षणिक भविष्याचा पाया आहे. २०४७ पर्यंतच्या विकसित महाराष्ट्रच्या ध्येयाकडे जाणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला पायाभूत व आधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळावे हा उद्देश आहे. – दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री