Pune : लिव्ह इनमधून मामाच्या मुलीचा खून; आरोपी पोलीस ठाण्यात झाला हजर

पुणे : चारित्र्याच्या संशयातून मामाच्या मुलीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना शुक्रवारी हडपसर येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राहुल शिवाजी मिसाळ (वय ३२,रा. यवत, मुळ रा. तांदुळवाडी, ता.माळशिरस) असे त्याचे नाव आहे. तर, अनिता उर्फ कमल विक्रम लोंढे (वय २८ रा. शेवाळवाडी फाटा, मांजरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
याप्रकरणी, अनिता हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हडपसर पोलिसांनी मिसाळ याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना शेवाळवाडी फाटा मांजरी येथे सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी राहुल मिसाळ आणि खून झालेली तरुणी अनिता लोंढे हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघेही विवाहीत असून एकमेकांच्या पती-पत्नीपासून वेगळे राहतात. मिसाळ हा मजुरी काम करतो. मागील काही दिवसांपासून ते लिव्हइनमध्ये राहत होते. परंतु, मिसाळ हा अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
गुरुवारी रात्री तो अनिताच्या शेवाळवाडी फाटा येथील घरी आला, त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच मिसाळ याने शुक्रवारी अनिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पळ काढला. मात्र, काही वेळानंतर तो स्वत: यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिता हिचा खून केल्याचे त्याने सांगितले.
यवत पोलिसांनी पुणे पोलिसांना कळविले, त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी पाहणी केली तेथे अनिता मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी अनिताच्या नातेवाईकांना कळविले असून मृतदेह ससून रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.





