Pune : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. रविवारी सायंकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मुरलीधर मोहोळ यांनी शपथ घेताच शहर भाजपने एकच जल्लोष केला.
मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची बातमी रविवारी सकाळी पुणेकरांना मिळाली. त्यानंतर दिवसभर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या शपथविधी सोहळा पाहण्यासाठी जोरदार तयारी केली होती. तर, एसपी महाविद्यालय चौक तसेच मोहोळ यांच्या कोथरूड येथील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी “काय म्हणता पुणेकर, मंत्री झाले मुरलीधर’ अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, मोहोळ यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
“केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचा अत्यंत आनंद झाला आहे. या माध्यमातून पुण्याला केंद्रात स्थान मिळाले आहे. पुणेकरांनीच मला ही मोठी संधी दिली आहे. देशाच्या विकासासाठी जेवढे कष्ट करता येतील तेवढे करेन.” – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री





