Pune : महापालिका भरवणार आठवडे बाजार; सेंद्रिय भाजीपाला, फळे उपलब्ध होणार

पुणे : जागतिक बॅंक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रीय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात चार आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या हद्दीतील ॲमेनीटी स्पेस लोहगाव, बाणेर, पाषाण, बावधन व बालेवाडी या ठिकाणची जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांत हे सर्व बाजार सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
शासनाच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीतून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हे आठवडे बाजार उभारले जाणार आहेत. शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जा मध्ये सुधारणा करून, शहरी भागातील ग्राहकांना विषमुक्त आणि ताजी फळे व भाजीपाला वाजवी दारात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच वाहतूक कोंडी कमी व्हावी हा उद्देशही असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणातर्फे (आत्मा) निवड केलेल्या समुदाय आधारित संस्थाना व शेतकरी उत्पादक कंपनी यांना या बाजारात विक्रीसाठी संधी देण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांचा अन्न पोषणाचा स्तर उंचावणे, शाश्वत अन्न व्यवस्था- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल व उत्पादने थेट शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्था निर्माण करणे तसेच शहरी भागातील नागरिकांना स्वच्छ, ताजे, गुणवत्तापूर्ण पोषणयुक्त फळे, भाजीपाला, मांस उपलब्ध करून देण्यासाठी हे बाजार महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
– पृथ्वीराव बी.पी., अतिरिक्त आयुक्त. पुणे मनपा





