Ganeshotsav 2022 : करोना : सार्वजनिक उत्सवातून पुणे पालिकेने जनजागृती करावी

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 30 – करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला आणि रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तरीही अद्याप या रोगाचा धोका पूर्णपणे टळला नाही. त्यामुळे ज्या नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीचे डोस अद्याप पूर्ण झाले नाहीत, त्यांच्यासाठी मंडळे आणि सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी जागृती करण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हे आणि महापालिकांना दिल्या आहेत.
नागरिकांनी उत्सवकाळात सुरक्षेचे नियम पाळावेत आणि काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु, अद्याप बऱ्याच जणांचे डोस पूर्ण झाले नसल्याने ते घेण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक मंडळे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी जनजागृती, लसीकरणाचे केंद्र उभारण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. शहरात येणाऱ्या भाविकांनाही लस घेता येणार आहे. करोनाची स्थिती पूर्णपणे कमी झाली नाही. करोना वाढीचा वेग राज्यात अजूनही सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आहेच. “हॉस्पिटलयाझेशन’ किंवा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी करोनाची लागण होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबले असे नाही.
याशिवाय उत्सवकाळात शहरात होणारी गर्दी प्रचंड असते. त्यातून दोन वर्षानंतर संपूर्ण निर्बंध शिथील होऊन उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिक, सार्वजनिक उत्सव मंडळे यांच्यात उत्साह संचारला आहे. तसेच पुणे शहरातील उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरातून अनेक भाविक शहरात येत असतात. त्यामुळे ती आणि एकूणच गणेशोत्सवाची आरास पाहण्यासाठी रस्त्यावर असलेल्या भाविकांची संख्या ही काही लाखांत जाते. अशावेळी करोनाचा फैलाव होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. गेल्या दोन वर्षांतही उत्सवानंतर करोना बाधितांची संख्या वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळेच नागरिकांनी उत्सवकाळात सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तोच एकमेव मार्ग गर्दीच्या काळात अधिक प्रभावी ठरू शकतो. तसेच लसीकरण करून घेणेही आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिली आहे.





