pune : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू
पुणे – राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती यांच्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकूण 17 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 398 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी दि.1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी 6 लाख 34 हजार 940 मतदार आहेत. 17 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी एकूण 730 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहे.
या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे. तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी उरुळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत. तर क वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरुनगर यांचा समावेश होतो. तर मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक यांचा समावेश नगरपंचायतीमध्ये होतो.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर क वर्ग नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे ११ तहसीलदार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीकरिता मुख्याधिकारी यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
एक वर्षांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेसाठी द्वि सदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे. तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.





