Pune : महापालिकेची असंवेदनशीलता…

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या दोन पर्यटकांचे पार्थिव बुधवारी रात्री लोहगाव विमानतळावर येणार आहे. त्यांचे पार्थिव आल्यानंतर घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेतील आरोग्य विभागाशी संपर्क करून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
त्यावर आरोग्य विभागाकडून चक्क आमच्याकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकार्यांना देण्यात आले. या प्रसंगामुळे एवढ्या मोठ्या महापालिकेकडे दोन रुग्णवाहिका नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन पर्यटकांचे पार्थिव लोहगाव विमानतळावर साधारणपणे बुधवारी सायंकाळी सहा वाजता येणार होते. त्यासाठी विमानतळावरून घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आले. त्या पत्रात दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
घटनेची तीव्रता पाहता पालिकेडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे उत्तर अपेक्षित होते. मात्र, यावर आरोग्य विभागाकडून संवदेशशीलता न दाखविता थेट तुम्ही अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यावर त्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली असता त्यांनी आमच्याकडे सुस्थितीत असलेली रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर दिली. एकंदर ही सुन्न करणारी घटना पाहता त्याबाबत तत्परता दाखविणे आवश्यक होते. मात्र, पालिकेतील या दोन्ही विभागांनी जबाबदारी ढकल्याचे दिसून आले.





