पुणे: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचा पुढाकार

“पीओपी’च्या मूर्तींवर बंदी; मार्गदर्शक सूचना जारी
पुणे – शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गणेशोत्सव काही महिन्यांवर आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी घातली आहे.
त्यामुळे, पीओपी गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून करण्यात आले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी 12 मे 2020 रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना
* शाडू माती, चिकनमातीपासून गणेश मूर्ती तयार करावी.
* पीओपी, प्लॅस्टिक आणि थर्माकोल यांचा वापर करू नये.
* सजावटीसाठी झाडं, नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा.
* जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा.
* रासायनिक रंगांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
* मूर्तीसाठी नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा





