Pune : सिंहगड काॅलेजला महापालिकेचा दणका

पुणे : महापालिकेकडून शहरात मिळकतकर थकबाकी वसूलीची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. त्याअंतर्गत वारंवार नोटीस देण्यात आल्यानंतरही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्युट संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील कार्यालय, मिळकती व कोंढवा बुद्रुक येथील मिळकतींवर महापालिकेने मंगळवारी जप्तीची कारवाई केली. ४९ मिळकतींची २१९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कर संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
सिंहगड इन्स्टिट्युटच्या शहरात आंबेगाव बुद्रुक, कोंढवा बुद्रुक व एरंडवणे येथे महाविद्यालये, शाळा, संस्थेची कार्यालये अशा मिळकती आहेत. संस्थेच्या विविध ठिकाणच्या मिळकतींचा तब्बल ३४५ कोटी रुपयांचा मिळकतकराची थकबाकी आहे. महापालिकेच्या मिळकतकर आकारणी विभागाकडून संस्थेला थकबाकी भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संस्थेकडून थकबाकी भरण्याकडे दूर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान, महापालिकेने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एरंडवणे येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय जप्त केले होते. संबंधित कार्यालय व मिळकतीची ४७ कोटी ४३ लाख इतकी थकबाकी होती. त्यानंतर आता मंगळवारी वडगाव बुद्रुक येथील ४३ मिळकती जप्त केल्या आहेत. त्यांची १९८ कोटी ६१ लाख इतकी थकबाकी आहे, तर कोंढवा बुद्रुक येथील ६ मिळकती जप्त केल्या असून त्यांची थकबाकी २० कोटी ५० लाख इतकी आहे.
सिंहगड इन्स्टिट्युटच्या विविध मिळकतींची अनेक वर्षांपासून थकबाकी आहे. नोटीस बजावनूही त्यांनी थकबाकी भरलेली नाही. मंगळवारी वडगाव बुद्रुक व कोंढवा बुद्रुक येथील कार्यालये, मिळकतींवर जप्तीची कारवाई केली आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, मिळकतकर विभाग




