समाविष्ट गावांबाबत ‘ये रे माझ्या मागल्या…’ पुणे महापालिकेची निवडणूक लांबली; प्रशासकीय राजवटीमुळे विकासकामांकडे दुर्लक्ष

औंध, दि.11 (अभिराज भडकवाड) – पुणे महानगरापलिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांचा पालिकेत समावेश झाल्यानंतर त्या गावांचा विकास खुंटल्याच्या पुर्वानूभव पाहता महाळुंगे, सूस गावच्या नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आपल्या गावाला दिल्या जाणाऱ्या सुविधा तातडीने मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. आमची गावे समाविष्ट झाल्यानंतर त्या गावांसारखी अवस्था होऊ नये, याचा पुनरुच्चारही ग्रामस्थांनी अनेकदा केला होता. त्याचत महापालिका निवडणूक लांबणे, प्रभाग रचनेनुसार 23 गावांना केवळ दोनच नगरसेवक मिळणे, पालिकेवर प्रशासकांची नियुक्ती आणि यातून समाविष्ट गावांसह महाळुंगे, सूस गावाकडे झालेले दुर्लक्ष म्हणजे ये…रे…माझ्या मागल्या…, अशी स्थिती झाल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर पुढील सहा-आठ महिन्यांत पालिकेची निवडणूक होणार होती. त्यामुळे आपल्या भागात स्थानिक नगरसेवक मिळून गावांचा विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी ठेवली होती. परंतु, पालिकेची निवडणूक लांबत गेली तसे गावातील जुन्या समस्या कायम राहून नव्याने वाढल्या. आजही गावातील सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, ड्रेनेज, रस्त्यांची कामे यासारख्या समस्या कायम आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला मर्यादा आल्याने वाढलेला अतिक्रमणांचा मुद्दा तसाच कायम आहे. शहराच्या हद्दीलगत असल्याने बांधकामांची अस्ताव्यस्त झालेली वाढ व यातून वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महाळुंगे, सूस परिसरातून पालिका समावेशाबाबत आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
कोणतेही ठोस काम नाही
महाळुंगे व सूस दोन्ही गावांतून माहिती तंत्रज्ञान नगरी हिंजवडीला जाणारा रस्ता असल्याने या परिसरात कायम वर्दळ असते. रस्ते अरुंद आणि वर्दळ जास्त यामुळे होणारी नित्याची वाहतूक कोंडी ही समस्या रस्ते मोठे होऊन सुटेल, अशी अपेक्षा असताना याबाबत कोणतेही ठोस काम झालेले नाही. केवळ ग्रामपंचायत कार्यालयाचा ताबा घेऊन केवळ नोंदी करण्यापुरतेच काम पालिकेने केलेले आहे.
मुख्य समस्या तशाच…
महाळुंगे, सूस या दोन्ही गावांतील सध्याचा ज्वलंत प्रश्न पाणी पुरवठा व वाढती बांधकामे आहेत. ग्रामपंचायतीला मिळणारा कराच्या स्वरुपातील निधी मर्यादीत असल्याने या समस्या सोडवणे शक्य झाले नव्हते, पालिकेत समावेशानंतर यावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेत समावेश झाल्यानंतर या समस्या टप्प्याटप्प्याने सुटतील अशी अपेक्षा होती. परंतु, पालिकेचा सगळाच अलबेल कारभार पहायला मिळत असल्याने, गड्या आपला गावच बरा होता, असेच ग्रामस्थ म्हणू लागले आहेत.




