पुणे महापालिकेची 400 जणांवर कारवाई ! शहरात अस्वच्छता करणाऱ्यांना केला दंड

पुणे – शहरात मुक्कामी दाखल होणारा पालखी सोहळा आणि जी20 परिषदेच्या निमित्ताने महापालिकेकडून जागोजागी सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच; या कामाच्या ठिकाणी थुंकून अथवा कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांवर अखेर कारवाई सुरू केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यासाठी पथके नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली असून गेल्या चार दिवसात तब्बल 400 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात, रस्त्यावर थुंकणाऱ्या 71 जणांवर तर अस्वच्छता करणाऱ्या 329 जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
या दोन्ही कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, पथ विभाग तसेच इतर विभाग सुशोभीकरण आणि इतर कामे करत असून महापालिका त्यावर कोट्यवधीचा खर्चही करत आहे. मात्र, महापालिकेने रंगरंगोटी केलेल्या ठिकाणी अथवा स्वच्छता केलेल्या ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका करण्यापासून अनेक प्रकारे अस्वच्छता केली जात असून पालिकेस वारंवार त्या ठिकाणी स्वच्छता करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी आता थेट कारवाईसाठी पथके नेमली असून अशा नागरिकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.
चार दिवसांत धडक कारवाई
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गेल्या चार दिवसांत 400 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी 329 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख 16 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 71 जणांकडून 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे उपायुक्त राऊत यांनी सांगितले, तसेच पुढील दोन दिवसांत ही कारवाई आणखी वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





