Pune : महापालिका आयुक्तांनी रुजविले रोपटे

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वनमहोत्सव उपक्रमांतर्गत इच्छुक वृक्षप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांना महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे उद्यान परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण विभाग आणि अतुल सलाग्रे, नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चार हजार बीज गोळे तयार केले असून, सदर बीज गोळ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण महापालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य उद्यान अधीक्षक, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त जयंत भोसेकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, विविध विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वृक्ष चिकित्सालय वाहन, हा उपक्रम राबविण्यात आला असून, या वाहनाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते झाले. या वाहनसेवेचे प्रमुख उद्दिष्ट शहरातील वृक्षांचे आरोग्य आणि देखभालीच्या गरजा पूर्ण करणे हे आहे.
यामध्ये वृक्षांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, वनस्पतीतज्ज्ञ आणि वृक्ष शल्यचिकित्सक यांच्यामार्फत प्राप्त सूचनानुसार वृक्षांवर प्रथमपोचार करणे, वृक्षांची लागवड, संगोपन आणि संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे याचा समावेश होतो. याशिवाय वृक्षांवरील खिळे काढून टाकणे, फसलेले लोखंडी पिंजरे, लोखंडी तारा काढून प्रथमोचार करणे आणि एकूणच झाडांचे आरोग्य सुनिश्चित करणे हादेखील उद्देश्य असून, यासाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि पीएमसी केअर नंबर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेच्या संकेतस्थळावरही ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.
पाच रुपयांत रोपे…
पुणे महापालिका हद्दीमध्ये वृक्ष लागवडीसाठी महापालिका वृक्ष प्राधिकरणामार्फत दि. ५ जून ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये एक ते दीड वर्षाचे स्थानिक जातींच्या रोपांचे प्रतिरोप पाच रुपये या सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. तसेच, सदर कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत देखील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. ही रोपे छत्रपती संभाजीराजे उद्यानातील रोपवाटिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.





