Pune : मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट; मिसिंग लिंक वर्षअखेरीस पूर्ण

पुणे, दि. १२ – मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. येथील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा आहे .यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल. प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तो पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रकल्पाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महामार्गावरील घाटाचा भाग प्रकल्पामुळे टाळता येणार आहे. घाटमार्गातील वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर महामार्गावरील प्रवास आरामदायी होणार आहे.
या प्रकल्पात एकूण तीन बोगदे असून त्यातील एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदीचा आहे. तो देशातल्या सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरेल. समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे.
देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधलेला नाही. हा देखील एक विक्रम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.





