पुणे : आमदार धंगेकर पोहचले डॉक्टरच्या वेशभूषेत

विधानभवनात अभिनव आंदोलन
पुणे – ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर दोषी अधिकाऱ्यांना अटक करा, चौकशीत दोषी ठरलेले ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि पाटील याला पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली.
या मागणीसाठी आमदार धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि अॅप्रन घालून डॉक्टरच्या वेशभूषेत विधानभवनात आले होते, त्यांनी आपल्या मागणीसाठी अभिनव आंदोलन केले.
यावेळी बोलताना आमदार धंगेकर म्हणाले की, ललित पाटील उपचाराच्या नावाखाली ससूनमध्ये दाखल झाला. याला ससूनमध्ये तब्बल 9 महिने पंचतारांकित सेवा दिली गेली. इथूनच तो अमली पदार्थाची विक्री करीत होता. या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची सुरवातीपासून मागणी आहे.
चौकशीत दोषी आढळलेले ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनाही अद्याप अटक झाली नाही. तसेच या राज्यातील काही मंत्री या प्रकरणात गुंतले आहेत. जे पोलिसांवर दबाव टाकत असून त्यांची नावेही जाहीर करावीत, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.





