pune: बेपत्ता फूड टेस्टिंग मशिन रातोरात अवतरले..!

आरोग्या विभागाचा मशिन प्रयोगशाळेतच असल्याचा खुलासा
pune: महापालिकेच्या आरोग्य विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुमारे ९.९८ लाख रुपये खर्चून खरेदी केलेले फूड टेस्टिंग मशिन आढळून येत नसल्याने आरोग्य विभागाने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे लेखी उत्तर दिले होते.
त्यानंतरही मशिनचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, माध्यमांमध्ये मशिन बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच हे मशिन रातोरात सापडल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. पुन्हा तपासणी केल्यानंतर संबंधित मशिन प्रयोगशाळेतच असल्याचा खुलासा विभागाने केला आहे.
महापालिकेच्या जुलै महिन्यातील मुख्य सभेसाठी नगरसेवक महेश वाबळे यांनी या मशिनबाबत लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरात मशिन प्रत्यक्ष पाहणीत आढळले नसल्याने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. ही बाब माध्यमांसमोर आल्यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा शोधमोहीम राबवून मशिन मिळाल्याचा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाच्या लेखी उत्तरानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सन २०१६-१७ मध्ये निविदा प्रक्रियेद्वारे फिवेग रॉ-फायबर एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम कंपनीचे एक फूड टेस्टिंग मशिन ९ लाख ९८ हजार रुपयांना खरेदी केले होते. हे मशिन संयुक्त प्रकल्पांतर्गत फूड हायजीन अँड हेल्थ लॅबोरेटरी या प्रयोगशाळेला वापरासाठी देण्यात आले होते. प्रयोगशाळेचा करार संपुष्टात आल्यावर सर्व उपकरणे पालिकेला देण्यात आली. त्यात या मशिनचाही समावेश होता.
एक नाही, दोन मशिन?
दरम्यान, प्रयोगशाळेतील मशिन सापडल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असला, तरी नगरसेवक महेश वाबळे यांनी प्रशासन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रयोगशाळेसाठी एक नव्हे, तर दोन फूड टेस्टिंग मशिन खरेदी करण्यात आली होती.
मात्र, प्रशासनाने आपल्या लेखी उत्तरात केवळ एका मशिनचाच उल्लेख केला आहे. याप्रकरणी मुख्य सभेत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे वाबळे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले. त्यामुळे प्रशासनाने एक मशिन सापडल्याचा दावा केला, तरी दुसरे मशिन बेपत्ता असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.





