Pune : मेट्रोचे काम अन् वाहतूक कोंडीत थांब!

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषिजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) दुमजली उड्डाणपुलाच्या कामानिमित्त बाणेर मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. मात्र, या बदलाचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या बदलामुळे कोंडीत वाहन चालक अडकत आहेत. ठिकठिकाणी मेट्रोचे खांब, बॅरिकेड्स, रस्त्यावर पडलेले साहित्य आणि कामामुळे उडणारी प्रचंड धूळ याला वाहन चालकांना तोंड द्यावे लागत आहे.
विद्यापीठ चौकात दुहेरी उड्डाणुलाच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १५ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर मार्ग बदल करण्यात आले आहेत. बाणेरकडून येणारी वाहतूक ओैंध रस्त्यावर वळविण्यात आली आहे. वाहनांनी राजभवनासमाेरुन (पंक्चर) वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे लागत आहे.
शिवाजीनगरकडून ओैंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने न्यावी लागत आहेत. औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात आली आहे. यामुळे ऐन कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
सेना दिन कार्यक्रमामुळेही विस्कळीतपणा
सेना दिनानिमित्त पुण्यात संरक्षण मंत्री, लष्कर प्रमुखांसह मोठे अधिकारी हे बुधवारी शहरात आले होते. यासाठी हॅरिस ब्रीज ते चंद्रमा चौक हा पूर्ण रस्ता लष्कराच्या विनंतीनुसार वाहतूक पोलिसांनी बंद केला होता. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भार इतर रस्त्यांवर आला होता. तसेच प्रमुख व्यक्तीचे आगमन आणि निर्गमनाच्या वेळी वाहतूक थांबवून ठेवावी लागत होती. यामुळेही इतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
धुळीचा त्रास
मेट्रोच्या कामामुळे परिसरात प्रचंड राडारोडा पडला आहे. ऐन वर्दळीच्या वेळी काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात प्रचंड धुळ उडत आहे. या धुळीतून शाळा- महाविद्यालयातील मुलांना तोंड झाकून मार्ग काढावा लागत आहे. हाच त्रास वाहन चालकांनाही होत आहे. रस्त्यावरील प्रचंड धुळ वाहने आणि नागरिकांच्या अंगावर उडत आहे.
वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे
– बाणेर रस्ता
– सिमला कार्यालय चौक
– संचेती चौक
– जंगली महाराज रस्ता
– डेक्कन
वाहतूक कोंडीची कारणे
– सतत वाहतूक मार्ग बदल
– मेट्रोची ठिकठिकाणी चाललेली कामे
– काही ठिकाणी रस्त्यामध्ये आलेले मेट्रोचे खांब
– कामांमुळे अरुंद झालेले रस्ते
– अनेक ठिकाणी मेट्रोचे बॅरिकेड्स




