PUNE: गणेशोत्सवात मेट्रो रात्री बारा वाजेपर्यंत धावणार; अजित पवार यांची घोषणा

पुणे : गणेशोत्सवात पुणे शहरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन मेट्रो रात्री बारा वाजेपर्यंत धावणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जाहीर केले.
आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पवार यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत सूचना मांडल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदाेबस्ताची तयारी केली आहे. गणेशोत्सवात वेगवेगळ्या भागातून भाविक येतात. गणेशोत्सवात भाविकांसाठी मेट्रो रात्री बारा वाजेपर्यंथ धावणार आहे. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. उत्सवाच्या कालावधीत मेट्रो सेवेची वेळ वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे, असे पवार यांनी नमूद केले.
शिंदे-फडणवीस यांच्यसोबत आम्ही खेळमेळीने काम करतो. मी स्पष्ट भूमिका मांडतो. ज्यांना माझी भूमिका पटत नाही. ते टीका करतात. दर आठवड्याला मी पुण्यात बैठक घेतो. बैठकीचा परिणाम किमान आठवडाभर राहील, याचे अपेक्षा मला वाटते. काही जण महिनाभराने बैठक घेतात, असे त्यांनी सांगितले.




