Pune : शुक्रवारी मेट्रोची सेवा दुपार पर्यंत बंद

पुणे : येत्या शुक्रवारी (दि. १४) रोजी धुळवडी निमित्ताने शहरातील मेट्रो सेवा काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, मेट्रो प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेट्रोची प्रवासी सेवा दोन्ही मार्गांवर सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत बंद असणार आहे. तर दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू करण्यात येणार आहे.
मेट्रोचे शहरात सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग सुरू असून, सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू आहे. मात्र, शहरात मोठया प्रमाणात धुळवड साजरी केली जात असल्याने मेट्रोची स्वच्छता, तसेच सुरक्षा या कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.
या पूर्वीही महामेट्रोकडून धुळवडीसह, रंगपंचमीला सेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच दिवाळीतही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही ठराविक कालावधीसाठी सेवा बंद ठेवण्यात आली होती.





