Pune Metro: वारीत मेट्रोचा विक्रमी प्रवास!
Pune Metro:

दोन दिवसांत सुमारे पाच लाख प्रवासी; वारकरी आणि पुणेकरांची प्रवासाला पसंती
पुणे – आषाढी वारीच्या दोन दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोने प्रवासीसंख्येचा नवा उच्चांक गाठला आहे. ९ आणि १० जुलै या दोन दिवसांत तब्बल ५ लाख ३ हजार ८०५ प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला.
पालखी सोहळ्यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असताना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा पर्याय स्वीकारला. त्याचबरोबर वारकऱ्यांसाठीही मेट्रो हे आकर्षण ठरले.
९ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहरात दाखल झाला, तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा विश्रांतवाडीतून पुण्यात दाखल झाला. या दोन्ही रस्त्यांवर वाहतूक बंद असल्याने नागरिकांनी पिंपरी-चिंचवड तसेच रामवाडी येथून मेट्रो प्रवासास प्राधान्य दिले.
महामेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी ३ लाख ५२ हजार ६०६ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील १ लाख ७२ हजार ४९०, तर वनाज ते रामवाडी मार्गावरील १ लाख ८० हजार ११६ प्रवाशांचा समावेश होता.
या दिवशी मेट्रोला ५७ लाख ३९ हजार ९०२ रुपयांचा महसूल मिळाला. तर १० जुलै रोजीही मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या दिवशी २ लाख ५१ हजार १९९ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर १ लाख २० हजार १९३, तर वनाज ते रामवाडी मार्गावर १ लाख ३१ हजार ६ प्रवाशांनी प्रवास केला.
या दिवशी मेट्रोला ४० लाख ८६ हजार २७६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. वारीच्या काळात वारकऱ्यांनी दर्शनस्थळे, पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांदरम्यान प्रवासासाठी मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. दुसरीकडे, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक निर्बंधांमुळे पुणेकरांनीही मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.





