Pune Metro: मेट्रोच्या विस्ताराला महापालिकेचा ‘ब्रेक’! तीन मुख्य मार्गांचे काम ठप्प; प्रकल्पाचा खर्च वाढणार?
Pune Metro: उड्डाणपुलांच्या आराखड्यांवरून महापालिकेचा निर्णय प्रलंबित; महामेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही काम सुरू होण्यात विलंब.
Pune Metro : महामेट्रो वनाज -रामवाडी या विस्तारित मार्गासह नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग हा नवा मार्ग विकसित करणार आहे. या मार्गाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून महामेट्रोने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. या मार्गावरील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने मेट्रो मार्गाबरोबर दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे.
आता या उड्डाणपुलांबाबत पालिकेचा अंतिम निर्णय होत नसल्याने विस्तारित मार्गासह नवीन मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. याबाबत पालिकेने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महामेट्रो सतत करत आहे. या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची भीती आहे. त्यातच पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या आराखड्यात लोकप्रतिनिधी वारंवार बदल सुचवत असल्याने प्रशासनही अडचणीत आहे.
चांदणी चौकातील गोंधळ
महामेट्रो वनाज ते चांदणी चौक या दीड किलोमीटरच्या मार्गाचे विस्तारीकरण करणार आहे. या मार्गावर दोन स्थानके असतील. हा मार्ग पौड रस्त्यावरून चांदणी चौकापर्यंत जाणार आहे. पालिकेने मेट्रो मार्गासोबतच वनाजपासून थेट चांदणी चौकापर्यंत जाणारा उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. या पुलाचा आराखडा गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा बदलला आहे. आराखडा अंतिम होण्याबरोबरच पुलाच्या खर्चाबाबत निर्णय होणे आवश्यक आहे.
उड्डाणपुलाची लांबीच ठरेना
महामेट्रो नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग हा ६.१२ किलोमीटर लांबीचा मार्ग उभारणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.याच मार्गावर सुरुवातीला कर्वे रस्त्यावरील करिश्मा चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. नंतर हा पूल मेट्रोच्या मार्गिकेतच उभारण्याचे ठरले. पुढे हा पूल महर्षी कर्वे पुतळ्यापर्यंत न्यावा अशी मागणी केली. आता हा पूल नळ स्टॉपपासून वनदेवीपर्यंत करावा, अशी मागणी होत आहे.
खराडी-खडकवासला मार्गही रखडला
केंद्राने लाइन-४ अंतर्गत खडकवासला ते खराडी या २५.५२ किलोमीटर लांबीच्या आणि २२ स्थानके असलेल्या मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाचा आराखडा राज्य शासन तसेच केंद्रानेही मान्य केला आहे. या मार्गाचा काही भाग सिंहगड रस्त्यावर अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या मधून जात असल्याने भविष्यात हा पूल अडचणीचा ठरू शकेल.
तातडीने निर्णय घ्या
“विस्तारित तसेच नवीन मेट्रो मार्गावर महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. ही दोन्ही कामे महामेट्रो करणार असली तरी अद्याप पुलांच्या आराखड्यांना तसेच खर्चाला पालिकेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेऊन काम सुरू करण्याबाबत पालिकेला कळविले आहे.”
– अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो
प्रक्रिया लवकरच पूर्ण करू
“चांदणी चौक आणि कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलांच्या आराखड्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात काही बदल सुचविण्यात आल्याने खर्च तसेच नियोजनात बदल केले आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून महामेट्रोला काम सुरू करण्यासाठी मदत केली जाईल.”
– दिनकर गोजारे, प्रकल्प विभाग प्रमुख, महापालिका




