Pune : १५ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : शहरातील एम.जी रस्त्यावरील एका दुकानात एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन विकणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजारांचा ७७ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली आहे.
हुसेन नुर खान (२१, रा. कोंढवा), फैजान अयाज शेख (२२, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील फैजान याचे एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्ली येथे की-मेकर्सचे दुकान आहे. शहर परिसरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते. दोन दिवसांपूर्वीच येरवड्यात पोलिसांनी २३ लाखांचे एम. डी. पकडले. तस्करांचा शोध घेवून त्यांना अटक करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्तीवर होते.
या दरम्यान एम.जी रस्त्यावरील कोळसा गल्लीतील एका दुकानात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे एम.डी. पावडर असल्याची माहिती अंमलदार विशाल दळवी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून खान आणि शेख यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडे १५ लाख ७० हजारांचे ७७ ग्रॅम एम.डी पावडर मिळून आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
अमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाईचे आदेश
अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालयातील बैठकीत दिले. शहरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक, तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश कदम यांनी दिले. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवावी, तसेच गुटखा, अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश त्यांंनी दिले. पुणे शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित (एआय) कॅमेरे बसल्यास गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यावेळी उपस्थित होत्या.





