Pune : हडपसर परिसरात पुन्हा १३ लाखाचे मेफेड्रोन पकडले

पुणे : हडपसर परिसरात मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद अख्तर शाह (३३, रा. राजतारा काॅम्प्लेक्स, लक्ष्मी काॅलनी, हडपसर) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १३ लाख १७ हजार रुपयांचे ५८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्या वेळी शाह याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सय्यद साहील शेख यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
त्याच्याकडून हे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, सय्यद साहिल शेख, संदीप शेळके, चेतन गायकवाड, संदीप जाधव यांनी ही कामगिरी केली.





