Pune : बैठकांना जोर पण निर्णयाअभावी कमजोर; पुण्यात मनसे इच्छुकांचा जीव टांगणीला

पुणे – महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा मतदारसंघनिहाय शहरातील गट अध्यक्ष, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडून तिकीट मिळेल, या आशेवर कामही सुरू केले आहे. परिणामी इच्छुकांच्या तयारीत जोर असला, तरी पक्षाकडून या निवडणुका स्वबळावर लढायच्या, की महायुती अथवा आघाडीसोबत, याबाबत स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते कमजोर पडले आहेत.
२०१७ मध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत मनसेचे केवळ दोनच नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एक नगरसेवक वसंत मोरे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे पक्षाचा एकच माजी नगरसेवक म्हणून शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे शहराची जबाबदारी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे.
स्वबळाचा धोका पत्कारणार का?
मनसेच्या स्थापनेनंतर २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०१२ मधील निवडणुकीत ही संख्या २८ झाली. तेव्हा दोन सदस्यांची प्रभाग रचना होती. त्यात क्राॅस वोटिंगचा चांगलाच फायदा झाल्याने मनसेला थेट विरोधी पक्ष नेतेपद मिळाले. मात्र, २०१७ मध्ये चार सदस्यांच्या प्रभागात मनसेचा हा विजयी रथ निखळून पडला आणि फक्त दोनच सदस्य निवडून आले.
आता पुन्हा २०२५ च्या महापालिका निवडणुका चार सदस्यांच्या प्रभागात होत आहेत. मात्र, या निवडणुका स्वबळावर, की महायुती- आघाडीसोबत या चर्चांमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कारण पक्षाकडून अजून कोणताच निर्णय झालेला नाही. त्यातच चार सदस्यांचा प्रभाग असल्याने पक्षाने इतर पक्षांसोबत आघाडी अथवा युती करावी, अशी इच्छुकांची भूमिका दिसते. त्यामुळे मनसे स्वबळाचा धोका पत्करेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उलटसुलट चर्चांनी गोंधळात वाढ
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्ष आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेकडून याबाबत वारंवार वक्तव्य होत असले, तरी मनसेच्या राज्यातील नेत्यांकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ही बैठक नेमकी कशासाठी झाली, हे गुलदस्त्यातच असले, तरी या उलटसुलट चर्चांनी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.





