पुणे : जगल्या सातपुतेला जेल बाहेर काढायचे आहे, 10 लाख रुपये दे म्हणून फिर्यादीचे अपहरण केले आणि धोबी घाटला नेऊन खंडणी मागितली म्हणून टोळी प्रमुख शंकर कोळी आणी इतर 7 आरोपींना अटक करण्यात आली होती. गंभीर गुन्हा असल्या कारणाने त्यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारलेला होता. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून ते येरवडा कारागृहात बंदिस्त होते. सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले होते. मुख्य म्हणजे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची साक्ष देखील या केस संदर्भात घेण्यात आली होती. साक्षीदारांच्या जबाबात तफावत, तसेच फिर्यादीने याआधी पोलिसांना देखील या गुन्ह्यात आरोपी करा, असा अर्ज केला होता. या सर्व पुराव्यांचा अभ्यास करून या गुन्ह्यातील 8 आरोपींची विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी नऊ वर्षानंतर सुटका केली. आरोपी शंकर कोळी, मंगेश सातपुते, तुषार सातपुते, सुभाष गडडम, सोनू रणपिसे, सादिक शेख, गणेश पवार, सिद्धार्थ लोखंडे अशी त्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख आणी इतर आरोपी तर्फे अॅड. इब्राहिम अब्दुल शेख यांनी कामकाज पाहिले. अॅड. फैजान शेख, अॅड. हर्षदा ताईवाडे, अॅड. विनायक माने, यांनी सहकार्य केले. काही आरोपीतर्फे अॅड. विपुल, कांबळे व सोहनी यांनी कामकाज पाहिले. ही घटना 28 नोव्हेंबर 2016 रोजी घोरपडे पेठ परिसरात घडली. फिर्यादी आसिफ शेख हा त्याच्या बांधकाम साईटवर आला असता त्याला आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने मोटर सायकल वर बसवून धोबी घाट जवळ नेले. त्याला मारून टाकण्याची धमकी दिली आणि आम्हाला जगल्याला सोडवायचे आहे म्हणून 10 लाखाची खंडणी मागितली. फिर्यादी त्याच्या तावडीतून सुटून आला आणि सर्व आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. गुन्हा घडल्यानंतर आरोपी लगेच पकडण्यात आले. पोलिसांनी सिसिटीव्हीचे फुटेज कोर्टात सादर केले नाही, फिर्यादीने बऱ्याच लोकांविरुद्ध फिर्याद दिलेल्या आहेत, कुणाल पोळ याचा खून झाला होता आणी फिर्यादी त्या गुन्ह्यात साक्षीदार होता. परंतु नमूद सर्व आरोपी त्या गुन्ह्यातून लगेचच जामीनवर सुटून आले. म्हणून फिर्यादीने वकीलाच्या सल्ल्याने फिर्याद तयार करून घेतली आणी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात जे पिस्तूल वापरले होते त्याचा वापर आरोपीनी आधी केला होता, याचा पुरावा पोलीस दोषारोप पत्रासोबत जोडू शकले नाहीत. जे साक्षीदार तपासण्यात आले ते फिर्यादीचे मित्र होते तसेच पोलिसांच्या तपासामध्ये बर्याच त्रुटी असल्याचा युक्तिवाद अॅड. शेख यांनी केला.